Thu, 02 Apr 2020
Contact No: +91 9000305252

भाग्य

भाग्य
Jun 22, 2019

नुकतीच दुपार टळून गेली होती. दोन-अडीच वाजले असावेत. संपूर्ण आकाश काळ्या ढगांनी व्यापून गेले होते. सोसाट्याने वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर पावसाच्या सरी कोसळत होत्या. संततधार पाऊस पडत असल्याने वातावरणात चांगलाच गारठा भरून राहिला होता. अशा गारठ्यात सखू आपल्याच विचारात गढली होती. तिचे मन आतल्या आत गदगदत होते. रडत होते. स्वत:च्या दु:खाचा भार तिला पेलवत नव्हता.

काही वेळ पूर्वीच तिचा नवरा संपत घराबाहेर पडला होता. त्याच्याबरोबर राहणे तिला आता कठीण जात होते. अग्नीच्या साक्षीने तिने त्याच्याबरोबर सात फेरे घेतले होते. म्हणून ती नाईलाजाने त्याच्याबरोबर रहात होती. लोकांना दिसण्यापुरतीच ती दोघे नवरा-बायको होती. बाकी नवरा­बायकोसारखे संबंध त्यांच्यात कधी घडलेच नव्हते. नवऱ्यावरचे तिचे मन पुरते उडून गेले होते. तो नजरेसमोर येवूच नये असे तिला वाटत होते. पण जे झाले त्याला काहीच इलाज नव्हता. आपला नवरा 'तसा' असेल याची तिला कल्पना नव्हती. आता तर तिने स्वत:बद्दल विचार करणेच सोडून दिले होते. तिचे मन करपून गेले होते. मरण येईपर्यंत जगायचं एवढंच तिने ठरवले होते.... आपल्या नशिबाला दोष देत ती अहोरात्र रडत होती.

सखूने प्रेमविवाह केला होता. घरच्यांचा विरोध जुमानता ती संपतबरोबर पळून आली होती. त्यामुळे घरच्यांनी तिच्यासाठी कायमचे दरवाजे बंद केले होते. नातेवाईकांनी तिच्याशी असलेले नाते तोडले होते. शेवटी तिने संपतबरोबर लग्न केले होते. संपत कसाही असला तरी मनाने मात्र अतिशय प्रेमळ होता. सखूवर त्याचे खूप प्रेम होते.

खरं तर संपत नामर्द होता.... सखूचीच नव्हे तर कुठल्याही स्त्रीची तो कामवासना शमवू शकत नव्हता. परंतु ही गोष्ट तिच्याशिवाय आणि तो सखूसाठी आणत असलेल्या गिर्हाईकाशिवाय कुणालाच माहित नव्हती. आणि कुणाला सांगूनसुध्दा ती गोष्ट खरी वाटली नसती. कारण संपत एखाद्या पहेलवानासारखा धिप्पाड  होता. शरीराने पिळदार होता. दिसायलाही देखणा होता. त्याने कुठलाही वेष धारण केला तरी तो त्याच्या उंचपुऱ्या धडधाकट शरीराला शोभून दिसायचा. ओठांवर फक्त मिशीची लव होती. दाढी अजिबात नव्हती. असा संपत नामर्द आहे हे कुणालाही सांगून खरं वाटलं नसतं.

 

पण ती गोष्ट खरी होती आणि तेच तर सखूचं मोठं दुर्दौव होतं.

संपतचं घर तसं मोठं होतं. स्वयंपाक घर सोडून घरात आणखी चार खोल्या होत्या. दोघांच्या मनाने घर फारच मोठ असल्याने कसलीच अडचण नव्हती. स्वयंपाक घरातच बाथरूम होता. माग्च्या परसात संडास होता. एका खोलीत सखू झोपत होती. तर दुसऱ्या खोलीत संपत झोपत होता. एक खोली पाहुण्यांसाठी ठेवलेली होती. सर्वात मोठी खोली म्हणजे पुढची खोली. त्या खोलीत टि.व्ही., फ्रिज, कपाटं अशा मोठ्या वस्तू होत्या. संपत सरकारी कचेरीत शिपाई असल्याने त्याच्याकडे या सर्व सुखसोयी होत्या.

विचारात गढलेल्या सखूने चार घास खाल्ले आणि खरकटी भांडी मोरीत नेवून ठेवली. गारठा जरा जास्तच वाढल्यामुळे तिने भांडी घासता तशीच मोरीत ठेवली आणि ती आपल्या खोलीत आली. अंगावर एकदम दोन ब्लँकेटस ओढून ती बेडवर पहुडली. गारठ्यामुळे तिला झोप लागली. पण ती पंधरा-वीस मिनिटेच निवांतपणे झोपू शकली. वाऱ्याचा एक जोरदार झोत सुसाट वेगाने खिडकीवर आदळला. त्याबरोबर खिडकीची तावदाने धडाधडा एकमेकांवर आदळली. जणू काही घराची भिंत कोसळण्याचाच तिला भास झाला. ती खडबडून जागी झाली. पाहते तर वार्याच्या वेगने खिडकीची तावदाने एकमेकांवर आदळत होती. तिने एक निश्वास सोडला.

त्यानंतर मात्र प्रयत्न करूनही तिला झोप लागू शकली नाही. ती फक्त डोळे मिटून पडून राहिली. पण रिकामं डोकं सैतानांच घर असं म्हणतात. त्याप्रमाणे सखूच्या मनातही नको-नको ते विचार येवू लागले. सर्वप्रथम तिच्या नजरेसमोर लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचा प्रसंग उभा राहिला.

संपतच्या रुबाबदार व्यक्कीमत्त्वाने, त्याच्या देखण्या रुपाने, धडधाकट प्रकृतीने सखुला मोहिनी घातली होती. सात-आठ वर्षे होवून गेली होती. या गोष्टीला. लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीची ती आतुरतेने वाट पहात होती. त्या पहिल्या मधुर रात्रीची तिने अनेक कल्पना चित्र रेखाटली होती. संभोगसुखाच्या कल्पनेने तिचे मन मोहरून गेले होते.

त्या रात्री जेवण झाल्यावर संपत तिला म्हणाला होता, 'सखू, तुझं काम आटोपलं की तू मधल्या खोलीत झोप. तोपर्यंत मी बाहेर जावून येतो.'

'अहो लवकर याल ना?' तिने अधीरतेने विचारले होते.

'अगं मित्रमंडळीना भेटायचंय, थोडाफार उशीर होईलच की.' तो अतिशय थंड स्वरात म्हणाला आणि सखूला प्रथमच मोठं आश्चर्य वाटलं होतं. त्याच्या वागण्याचं. खरं तर आपल्यासारखी तरणीताठी. यौवनाने मुसमुसलेली बायको जवळ असताना आपल्याला मिठीत घ्यायला त्याने अधीर व्हायला हवे होते. असं तिला वाटत होते. पण तो तिच्याजवळ येता घराबाहेर निघून गेला होता.

काम उरकताच सखू डोळ्यात प्राण आणून त्याची वाट पहात होती. साधारण बाराच्या सुमारास तो आला. सखूला झोप येणे शक्यच नव्हते. आल्या आल्या तो आपल्याजवळ येवून आपल्याला मिठीत घेईल असं तिला वाटलं होतं. पण तो त्या खोलीत आलाच नाही. तो बाहेरच्या खोलीतच झोपला. काही वेळ वाट पाहिल्यानंतर ती उठली. तो झोपलेल्या खोलीकडे गेली. पण आतून त्याने दाराला कडी लावली होती.

'अहो, दार उघडा ना...' ती दरवाजा ठोठावत म्हणाली.

चार-पाच वेळा हाका मारल्यावर त्याने दरवाजा उघडला.सखू आत आली. आणि आश्चर्याने त्याच्याकडे पहात राहिली. संपतच्या डोळ्यातील अश्रू गालावरून खाली ओघळत होते. तिला काहीच अर्थबोध होईना.

'काय झालं हो... असे रडता का?' तिने काळजीच्या स्वरात विचारले.

'काही नाही ... इकडे कशाला आलीस तू?' त्याने प्रतिप्रश्न केला.

0 Comments

Post Comments