चाळीशीनंतर स्त्री व पुरुष यांच्यामध्ये वजन-मापी बरेच शारीरिक बदल होत असतात. बेढबपणा हा पुष्कळांच्या बाबतीत एक अविभाज्य भाग बनतो. त्यामुळे स्वत:च्या किंवा आपल्या जोडीदाराच्या शारीरिक बदलांमुळे येणारी मानसिक उदासिनता बरेचदा सेक्समध्ये खोलवर परिणाम करते. कामेच्छा कमी होणे व त्यामुळे सेक्सच्या प्रतिसादावर विपरीत परिणाम होणे असे पण सर्वसाधारणपणे घडत रहाते. यामुळे दांपत्यातील कलहाला तोंड फुटते आणि संबंधही तणावाचे बनू शकतात. लैंगिक समस्या निर्माण होऊन गंभीरही बनतात.
स्त्री-पुरुषांचे, विशेषत पुरुषांचे, कामोत्तेजन हे जोडीदाराच्या देहबांधा व देहबोली यांच्याशी निगडीत असते. हे सर्व प्रमाणबद्ध असल्यास सेक्सचा प्रतिसाद व्यवस्थितपणे विकसित होतो. चाळीशीनंतर शरीरात घडणारे हॉर्मोन्सचे बदल व मधुमेहासारखे काही आनुवंशिक शरीर-शत्रू यामुळे शरीराची ठेवण बदलू शकते. स्त्रीमध्ये तिच्या गरोदरपणामुळे व प्रसूतीमुळे महत्वाचे शारीरिक बदल होऊन बेढबपणा येत असतो. एवढेच नव्हे तर फार काळ बाळाला स्तनपान करु दिल्यास स्तनांचा घट्टपणा कमी होतो. त्याची मृदुता वाढल्याने पुरुषाचे कामोत्तेजन कमी होते. ब्रेस्ट-एन्हान्सर्स, स्तनवृद्धीसाठी औषधे किंवा मलमे निरुपयोगी असतात. छातीचे व्यायाम स्नायूंना बळकटी आणतात. स्तनांची घनता टिवण्यासाठी गरोदरपणातच काळजी घेतली पाहिजे. स्तनपतनासाठी काही शस्त्रक्रिया उपयोगी पडतात. ब्रेस्ट लिफ्टींगमुळे स्तनांचा बेढबपणा जाऊन ते प्रमाणशीर बनू शकतात.
म्हणून चाळीशीनंतरचे सेक्स अपील टिकवण्यासाठी चाळीशीपूर्वीच विचार केला पाहिजे. चरबीचे प्रमाण नैसर्गिकपणे वाढत असते. तेव्हा नियमित व्यायामाने पुरुषाने आणि विशेषत स्त्रीने आपली फिगर चांगली राखली पाहिजे. वयोमानाप्रमाणे शरीराची लवचिकता टिकवली गेली पाहिजे. सेक्सच्या वेगवेगळ्या पोझिशनला त्याचा उपयोग होतो. पोट कमी करण्यासाठी आहार व व्यायाम यावर भर दिला पाहिजे. योगासनांचा उपयोग शारीरिक लवचिकता वाढवण्यासाठी होऊ शकतो. विविध स्ट्रेचींग व्यायाम विशेषत कंबरेचे व्यायाम स्त्रीला जास्त उपयोगी पडतात.
दारुच्या व्यसनाने पुरुषाचे पोट सुटण्याची समस्या निर्माण होते तसेच तंबाखूच्या सेवनाने किंवा सिगारेटच्या व्यसनाने तोंडाला निकोटीनचा उग्र वास येत राहतो. यामुळे काहीवेळा स्त्रीला चुंबन आल्हाददायक वाटत नाही. काहीवेळा तिचा मूड ऑफ होऊन कामेच्छाही कमी होते. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी पुरुषाने आपले व्यसन बंद करणेच संयुक्तिक ठरते. ज्यांना हे व्यसन असेल त्यांनी आपल्या दातांचे ब्रशिंग करुन जीभही साफ केली पाहिजे. जिभेवर येणाऱ्या थरामध्ये जंतूंची वाढ होऊन उग्र मुखवास येऊ शकतो.
चाळीशीनंतर मधुमेह, मानसिक ताण आणि व्यसने यांच्याविषयी जागरुक रहाणे आवश्यक असते. आंतरव्यक्ती संबंध हे सौहार्दपूर्ण कसे राहतील याची प्रत्येक दांपत्याने जाणीवपूर्वक काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक स्त्रीने रात्रीचा वेळ आपल्या पतिराजांसाठी देणे आवश्यक आहे. केवळ मुलांची आई न रहाता पतीची पत्नी म्हणूनही आपण आहोत हे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. रात्रीचा दहा नंतरचा वेळ पतीबरोबर गप्पा मारण्यासाठी, व्यक्तिगत संवाद साधण्याला व शृंगारिक वागण्याला प्राधान्य देण्यासाठी आहे हे विसरु नये. शरीराने जरी नाही तरी मनाने रंभा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पती-पत्नींनी एकमेकांच्या प्रेमात पडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. याला साहचर्य प्रेम किंवा कम्पॅनियनशिप लव असे म्हणतात. प्रत्येक दांपत्याने आपला संसार यशस्वी करण्यासाठी साहचर्य प्रेम विकसित करणे जरुरीचे आहे. हे कष्टसाध्य आहे. यामुळे मने जुळतात व शारीरिक सुखातील रुटीननेस बोचत नाही. आपलेपणाची जाणीव चाळीशीनंतर फार सुखावह असते. तारुण्यातील गुर्मी व वृद्धत्वातील असहाय्यपणा यांच्या मधला हा काळ असून मानसिक परिपक्वतेचा विकास याच वेळी होत असतो. याचा कामजीवनावरही योग्य परिणाम होतो.
कामजीवन हे सहजीवन असल्याचे जाणवू लागते. एकमेकांना आदर देणे, मैत्रीची भावना निर्माण करणे, आपुलकी, जोडीदाराची काळजी घेण्याची प्रवृत्ती या सर्वांची झालर घेऊन जेव्हा वासना निर्माण होते तेव्हा त्यातील माधुर्य अवीट असते. सेक्स अपील केवळ शारीरिक न रहाता मानसिक होते.


Your email address will not be published. Required fields are marked *


No Comment found for this newsविशेष

VIEW ALL